केजरीवालांना ईडीने आजवर अनेक नोटीसा पाठविल्या आहेत. परंतु प्रत्येक नोटीसवर आपकडून यामागे ईडी कट रचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या या नोटीसविरोधात केजरीवाल उच्च न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणी कोर्टाने ईडीला पुरावे घेऊन येण्यास सांगितले होते. ईडीने या पुराव्यांची फाईल कोर्टासमोर हजर केली आहे. ही फाईल पाहून कोर्ट महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तोवर केजरीवालांना अटक करू नका, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दिल्ली हायकोर्टाने ईडीकडे पुरावे मागितले होते. यानंतर लगेचच ईडीचे अधिकारी पुरावे घेऊन न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये पोहोचले आहेत. ही फाईल न्यायमूर्ती पाहत आहेत. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर होण्यास आपल्यास अडचण नसल्याचे म्हटले होते, परंतु जर अटक होणार नसेल तरच चौकशीला हजर राहू, अशी अट घातली होती.
तसेच ईडीने पाठविलेल्या नोटीस या बेकायदेशीर असल्याचा मुद्दा केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु संघवी यांनी उचलला होता. यामुळे हा मुद्दा सुनावणी योग्य आहे की नाही हे कोर्टाने ईडीला विचारले होते. यावर ईडीने हा मुद्दा सुनावणी योग्य असल्याचे म्हटल्याने यावर २२ एप्रिलला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
ईडीने अटकेपासून सुरक्षा देण्याच्या अंतरिम आदेशांना नियम म्हटले जाऊ शकत नाही असे म्हटले आहे. कोर्टाने यावर तुम्ही केजरीवालांना नोटीसवर नोटीस का पाठवत आहात, अटक का करत नाही, कोणी रोखलेय असा सवाल विचारला. यावर ईडीचे वकील एसव्ही राजू यांनी केजरीवालांना अटकेसाठी बोलविले जात आहे, हे कोणी म्हटले आम्हाला माहिती नाही, असे कोर्टाला उत्तर दिले. यावर कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा देत त्यांना अटक करू नये असे ईडीला म्हटले आहे. तसेच केवळ चौकशीसाठी बोलवा असेही निर्देश दिले आहेत.