नवी दिल्ली - कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची बुधवारी रायचूर जिल्ह्यात जमलेल्या जमावासमोर जीभ घसरली. भडकलेल्या कुमारस्वामींनी जमलेल्या जमावासमोर आपला संताप व्यक्त करत तुम्ही मतदान नरेंद्र मोदींना केलं आणि मदत मला मागता का, असा सवाल केला. स्थानिक वृत्तवाहिनीने याचा व्हिडिओ शेअऱ केला आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार एका ठिकाणी जात होते. त्याचवेळी काही लोकांनी त्यांची गाडी अडवली. लोकांनी त्यांच्या गाडीला घेरले. तसेच घोषणाबाजी केली. त्यावर संतापलेल्या कुमारस्वामींनी म्हटले की, तुम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले आहे.
दरम्यान हे कुमारस्वामी यांनीच म्हटले का हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र स्थानिक वृत्तवाहिनीने हे वक्तव्य कुमारस्वामी यांचेच असल्याचा दावा केला आहे. तुम्ही सर्वांनी नरेंद्र मोदींना मतदान दिले. तुमचा मी सन्मान करायला हवा का, तुमच्यावर लाठीचार्ज करण्याची गरज आहे का, नरेंद्र मोदींना मतदान करून आणि मदत माझ्याकडून हवी का, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी स्थानिकांना विचारल्याचे येथील वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. यावर भाजपने कुमारस्वामी यांच्यावर टीका केली आहे. तसेच कुमारस्वामी हताश झाल्याचे म्हटले आहे.
भाजपनेते रविशकुमार म्हणाले की, लोकांशी बोलताना कुमारस्वामी फारच आक्रमक होते. ते एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे बोलत होते. हे चांगल नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहु इच्छित नसाल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडून द्यावे, असंही रवीश कुमार यांनी नमूद केले.