HD Kumaraswamy Bleeding During Press Conference: केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली. बंगळुरुमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या नाकाला अचानक रक्ताची धार लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री येडियुरप्पादेखील उपस्थित होते.
एएनआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नाकातून रक्ताची धार लागल्याचे आणि त्यांच्या शर्टवरही रक्त पडलेले दिसत आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांना नेमकं काय झालं, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यात काहीही गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ते लवकरच ठीक होऊन दिल्लीला परतणार आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक झाली. यादरम्यान कर्नाटकातील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यासह इतर अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चर्चा झाली. बैठकीनंतर विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
राज्यातील काँग्रेस सरकारने आदिवासी समाजाची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. आता दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून राज्यात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होणार आहेत. ही सात दिवसांची यात्रा असून ती 3 ऑगस्टला सुरू होऊन 10 ऑगस्टला संपेल. 10 ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत.