Atul Subhash Wife Nikita Singhania : बंगळुरूतील अभियंते अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. तसेच अतुल यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. मात्र आता अतुलच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलं आहे.
मुळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या अतुल सुभाष यांनी सोमवारी बंगळुरूच्या मुन्नेकोलाल येथे राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर अतुल यांचा भाऊ विकास कुमार यांनी पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात बंगळुरूच्या मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी बंगळुरू पोलिसांचे पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशला गेलं आहे.
मात्र अतुल सुभाष यांच्या आत्महत्येबाबत बेंगळुरू पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे उत्तर प्रदेशच्या जौनपूर पोलिसांनी म्हटलं आहे. सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया जौनपूरची रहिवासी आहे. तिने हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली २०२२ मध्ये अतुल, त्याचा भाऊ आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जौनपूर पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, २४ एप्रिल २०२२ रोजी निकिताने स्थानिक पोलीस ठाण्यात सुभाषविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका यांनी या प्रकरणाचा तपास करत ३० ऑगस्ट २०२२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
निकिताचे नातेवाईक सुरेंद्र सिंघानिया यांनी सांगितले की, "निकिता आणि अतुल यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि लग्नानंतर दोघेही बंगळुरूमध्ये काम करत होते आणि तिथेच राहत होते. त्यांना एक मुलगाही झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून निकिताला अतुलकडून घटस्फोट घ्यायचा होता आणि त्यासाठी जौनपूर न्यायालयात तिने तीन-चार खटले दाखल केले होते. सध्या निकिता तिच्या मुलासोबत दिल्लीत राहते आणि तिथे काम करते."
अतुलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये निकिताची बाजू मांडणारे वकील दिनेश मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की,"निकिताने अतुलविरुद्ध अनेक खटले दाखल केले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा खटला कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी निकिताने स्वत:च्या आणि मुलाच्या पालनपोषणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अतुलला पत्नीच्या पालनपोषणासाठी दरमहा ४० हजार रुपये देण्याचे निर्देश देण्याचा आदेश दिला होता. जुलै महिन्यापासून आपण अतुलशी भेटलो किंवा बोललो नाही. अतुल नैराश्यात आहे किंवा मानसिक तणावाचा बळी आहे, असे कधीच वाटले नाही."
निकिताने दोन वर्षापूर्वी जौनपूरमध्ये हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तिचा पती, सासू, सासरे आणि भावजय यांना आरोपी करण्यात आले होते. निकिताने दावा केला की, "माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करायचा. तो मला धमकावायचा आणि माझा संपूर्ण पगार माझ्या खात्यातून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करायचा. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि १७ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता."