केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पोट्टा येथे फेडरल बँकेच्या शाखेत एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या स्कूटरवरून आलेल्या निळ्या रंगाचं जॅकेट घातलेल्या एका इसमाने बँकेत घुसून अवघ्या अडीच मिनिटांमध्ये जे काही केलं, त्यामुळे सारेच अवाक् झाले आहेत. या इसमाने चाकूचा धाक दाखवत संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना वॉशरूममध्ये कोंडले. त्यानंतर बँकेतील सुमारे १५ लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आणि तिथून पोबारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक इसम शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्कूटरवरून येऊन बँकेबाहेर थांबला. त्यावेळी बहुतांश कर्मचारी लंच ब्रेकवर होते. तसेच केवळ दोन कर्मचारी बँकेत ड्युटीवर होते. आरोपीने चाकूचा धाक दाखवून या दोन्ही कर्मचाऱ्यांना वॉशरूममध्ये नेऊन कोंडले. त्यानंतर खुर्चीने कॅश काऊंटरवरील काच तोडून त्यातील १५ लाख रुपये घेतले आणि स्कूटरवरून फरार झाला.
त्रिशूर ग्रामीणचे एसपी बी. कृष्णकुमार यांनी सांगितले की, हल्लेखोर हा हिंदीमध्ये बोलत होता. कॅश काऊंटरमध्ये ४७ लाख रुपयांची रोकड होती. मात्र त्याने केवळ १५ लाख रुपये उचलले. आरोपीने बँकेतील कानाकोपरा माहिती असल्याप्रमाणे अवघ्या अडीच मिनिटात ही चोरी करून तिथून यशस्वीपणे काढता पाय घेतला.
आता पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र त्याच्याबाबत अद्याप कुठलाही पुरावा सापडलेला नाही. प्राथमिक तपासामध्ये आरोपी हा बँकेच्या संपूर्ण परिसराबाबत माहितगार असावा अशी शंका उपस्थित होत आहे. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरव्यांच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.