शीला दीक्षित यांना पदावरून दूर करण्यासाठी जोरदार मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:18 AM2019-07-19T04:18:43+5:302019-07-19T04:19:05+5:30
दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापत आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापत आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांना पदावरून दूर करण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन, अरविंदर सिंह लवली व नसीब सिंह सक्रिय झाले आहेत. शीला दीक्षित यांनी आपल्या अनुपस्थितीत ही जबाबदारी त्यांचे पुत्र व माजी खासदार संदीप दीक्षित यांच्याकडे सोपवू नये, यासाठी तिघांचे जोरदार प्रयत्न सुरू
आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शीला दीक्षित यांच्याकडे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हापासूनच हे नेते त्यांच्याविरोधात सक्रिय होते. आम आदमी पार्टीशी निवडणुकीत आघाडी करण्याचा मुद्दा चर्चेत आला तेव्हाच शीला दीक्षित यांच्याबाबत पहिला हंगामा झाला. राहुल गांधी यांची इच्छा असूनही शीला दीक्षित यांच्या भूमिकेमुळे ही आघाडी होऊ शकली नाही.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको यांनी या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेतली. पक्ष चालविण्याची जबाबदारी त्यांनी कार्यकारी अध्यक्षांकडे सोपवली, तसेच शीला दीक्षित यांना पत्र लिहून सूचितही केले की, त्या फोनवर संवाद साधत नाहीत व पत्रांना उत्तरेही देत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत पक्ष चालविण्याची जबाबदारी कार्यकारी अध्यक्षांकडे सोपविण्यात आली आहे. शीला दीक्षित यांना प्रदेशाध्यक्ष करतेवेळी राहुल गांधी यांनी कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती केली होती, हे विशेष.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित या त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, ही बाब प्रदेशातील नेत्यांना मान्य नसल्यामुळे संघर्ष वाढला आहे. याच दरम्यान, माकन, अरविंदर व नसीब यांनी पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात घेऊन मोहीम सुरू केली
आहे.
आतापर्यंत पक्षाच्या २९ ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी विश्वासात घेतल्याचे बोलले जात आहे. यात माजी अध्यक्ष जे.पी. अग्रवाल यांचाही समावेश आहे. या मोहिमेत तिन्ही कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोटिया, हरुण युसूफ व देवेंद्र यादव हेही सहभागी आहेत. या सर्वांची एकच मागणी आहे की, शीला दीक्षित यांना पदावरून दूर करून तात्काळ नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी सोपवावी जेणेकरून निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन पूर्णपणे सक्षम बनेल.
>पक्ष प्रभारींकडे केली तक्रार
सध्या शीला दीक्षित या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाचे कामकाज पाहू शकत नसल्याने त्यांना पदावरून दूर करण्यासाठी दिल्लीचे काँग्रेस नेते सज्ज झाले आहेत. अनेक नेत्यांनी काँग्रेसचे प्रभारी पी.सी. चाको यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. वेळीच यात हस्तक्षेप केला नाही, तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाची गत होईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे.