लखनौ - रस्त्यावर मजूर पाहून कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेली यंत्रणा फेल झाल्यासारखे वाटते, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं. तसेच, देशातील अनेक राज्यांमधून मजूरांचे होणारे स्थलांतर पाहता, सरकारी यंत्रणा फोल ठरल्याचे दिसून येत आहेत. हजारो किलो मीटरचा प्रवास करुन मजूर, कामगार आणि स्थलांतरीत नागरिक गावाची वाट धरत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत हे मजूर गावी पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, चेकपोस्टवरील पोलिसांकडून काहींना परतीच्या प्रवासाच्या सूचना देण्यात येत आहेत
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे. त्यानंतर, सर्वच राज्यातील नेत्यांकडून मजूरांना चालत न जाण्याची विनंती करण्यात येत आहे. मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये, अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही अडकले आहात आणि तुमची घरी जाण्याची इच्छा आहे, तर आम्ही ट्रेनची व्यवस्था करीत आहोत. बिहार, मध्य प्रदेशला रेल्वेगाड्या गेल्या आहेत. अजून थोडावेळ वाट पाहा, पण पायी चालत जाऊ नका.", असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. मात्र, मजूरांची पायपीट काही केल्या बंद होताना दिसत नाही.
परिस्थितीपुढे मजबूर झालेला मजूर काहीही करत आपलं घर गाठत आहे. मात्र, त्याला आर्थिकसोबतच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणातून एक गरीब, स्थलांतरीत मजूर चक्क यमुना नदी पार करुन उत्तर प्रदेशात पोहोचला होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अडवून पुन्हा परतीचा प्रवास करायला भाग पाडले. मी जीव धोक्यात घालून यमुना नदी पार केली, एवढं मोठं पाणी नदीला आलेलं आहे. तरीही, मी यमुना पार करुन आलो. पण, पोलिसांनी मला अडवून काठीनं मारलं. त्यानंतर, मला इथं सोडून ते निघून गेले, असे भावनिकतेनं सांगतानाचा एका गरीब मजूराच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदींसमवेत आज सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत असून लॉकडाऊन शिथिलता आणि कोरोनाच्या महामारीच सामना कसा करायचा, याबाबत चर्चा होणार आहे.
आणखी वाचा
'राज्यात दारुची ऑलनाईन बुकिंग अन् होम डिलिव्हरी करण्याचा सरकारचा विचार'
'राज्यातील स्थलांतरीत अन् विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवासाचे तात्काळ आदेश द्या'