वाराणसी - भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज शिखर धवन सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर शिखर धवन गंगा किनारी पोहोचला. मंगळवारी वाराणसी येथे पोहोल्यानंतर धवनने बाबा विश्वानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन विशेष अभिषेकही केला. सध्या अध्यात्मात तल्लीन झालेल्या शिखरने गंगा किनारी जाऊन आरतीत सहभागी होण्याचा आनंदही घेतला.
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन वाराणसीला गंगा किनारी पोहोचला आहे. बुधवारी सायंकाळी दश्वाश्वमेध घाटावर होणाऱ्या जगप्रसिद्ध गंगा आरतीत शिखरने सहभाग घेतला. आपल्याला कुणी ओळखू नये, यासाठी धवनने चेहऱ्यावर मास्क लावला होता, तर शरीरही एका कापडात झाकून घेतलो होते. मात्र, लोकांच्या नजरा तीक्ष्ण असतात, अनेकांनी धवनला ओळखले. त्यानंतर लांबूनच काहींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओही काढले आहेत. त्यानंतरही शिखरने गंगा सेवा आरतीचा पूर्णपणे आनंद घेतला.
शिखर सध्या वाराणसीला धार्मिक सहलीसाठी आलाय, मंगळवारी त्याने आपल्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन ओमकार चित्रपटातील गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. तर, टीम इंडियाच्या अजिंक्य विजयाबद्दल संघाचे अभिनंदनही केलंय. त्यावेळीही, तो वाराणसी येथील एका हॉटेलमध्येच होता. आपल्या एका स्थानिक मित्रासमवेत तो सध्या काशी-बनारसची यात्रा करत आहे.