ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. 14 - स्वभाव न पटणाऱ्या आणि पदोपदी खटके उडणाऱ्या सासू-सुनांचे अनुभव घरोघरी येत असले आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांचे रसभरित चित्रण दाखविले जात असले तरी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील अनंतपूर गावात एका 90 वर्षांच्या सुनेने तिच्या 102 वर्षांच्या सासूला रविवारी मातृदिनी शौचालय भेट देऊन या नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.चंदना नावाच्या या सुनेने तिच्या सासूला ही आगळी भेट देऊन केंद्र सरकारच्या हागणदारी मुक्ती मोहिमेची ती एक प्रेरणादायी दूत ठरली. महिलांचे दु:ख आणि अडचणी फक्त महिलाच जाणू शकतात आणि यासाठी नाते गौण ठरते हेही या उदाहरणावरून दिसून आले. परिस्थितीने गरीब असलेल्या चंदनाच्या घरात शौचालयाची सोय नाही त्यामुळे तिला व तिच्या सासूला नैसर्गिक विधींसाठी घरापासून लांब उघड्यावरच जावे लागायचे. एरवी ज्या वयात घरातल्या घरात फिरणेही दुर्लभ होते अशा वयात या दोघी एकमेकींच्या सोबतीने तशा जायच्याही. पण काही दिवसांपूर्वी चंदनाची सासू पाय अडकून पडली आणि पाय मोडल्याने तिला दूरवर जाणेही दुरापास्त झाले.ही बातमी कळल्यावर या आडगावात टीव्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली. चंदनाचा मुलगा राम प्रकाश याने सांगितले की, आईची आणि आजीची अडचण लक्षात घेऊन सरकारी योजनेत घराजवळ शौचालय बांधून द्यावे यासाठी सरपंचाकडे व जिल्हा प्रशासनाकडे अनेक खेटे घातले. पण कोणी लक्ष दिले नाही. सरकारकडून काही होणार नाही, हे पाहिल्यावर चंदनाने स्वत:च पुढाकार घेतला आणि कुटुंबाच्या चरितार्थाला हातभार लावण्यास ज्यांची मदत व्हायची त्या सहा शेळया विकून शौचालय बांधण्यासाठी पैशांची सोय केली. खपकेपणाने मागे उभे राहून तिने शौचालय बांधून घेतले व ते रविवारी मातृदिनी सासूला भेट दिले.जबाबदारीची टाळाटाळअनंतपूरच्या सरपंचांनी जबाबदारी झटकत जिल्हा प्रशासनास दोष दिला आणि गावात ज्यांना शौचालये बांधायची आहेत अशांची यादी अनेक वेळा पाठवूनही प्रशासनाने काही केले नाही, असा आरोप केला. आता चंदना कौतुकाचा विषय झाल्यावर जिल्हा प्रशासन जागे झाले असून या प्रकरणी टाळाटाळ करणारे कोण याची चौकशी केली जाईल, असे सांगितले जात आहे.
102 वर्षांच्या सासूला सुनेने दिली ‘मातृदिनी’ आगळी भेट
By admin | Published: May 14, 2017 10:39 PM