ऑनलाइन लोकमत
भावनगर, दि. 9 - देशभक्तीची भावना आपल्या सर्वांमध्ये आहे. प्रत्येकाला आपल्या देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा असते. पण फार कमीवेळा आपण मनातील भावना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवतो. गुजरातच्या भावनगरमध्ये राहणा-या जर्नादन भट्ट यांनी देशभक्ती आणि देशसेवेचे अनोखे उदहारण इतरांसमोर ठेवले आहे. भावनगरमध्ये राहणा-या 84 वर्षी जर्नादन भट्ट यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई जवानांसाठीच्या राष्ट्रीय सुरक्षा फंडाला दिली आहे.
जर्नादन भट्ट एसबीआय बँकेत नोकरीला होते. खरतर उतारवयात माणसाला पैशाची जास्त आवश्यकता असते. पण भट्ट यांनी स्वत:च्या गरजांपेक्षा सीमेवर लढणा-या जवानांचा विचार केला आणि आयुष्यभर मेहनतीने जमवलेले पैसे राष्ट्रीय सुरक्षा फंडाला दिले. जर्नादन यांना देशासाठी काहीतरी करायचे होते. सीमेवर पाकिस्तान बरोबर रोज चालू असलेल्या धुमश्चक्रीत जवान शहीद होत असल्याच्या बातम्यांनी त्यांचे मन व्यथित झाले होते.
देशासाठी लढणा-या जवानांना आपल्याकडून मदतीचा हातभार लागावा या हेतून त्यांनी 1 कोटी 2 लाख रुपयांचे डोनेशन दिले. जर्नादन यांनी त्यांच्या मिळकतीतून ब-यापैकी पैशांची बचत केली होती तसेच वेळोवेळी फंडामध्ये पैसे गुंतवले होते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना चांगला पैसा मिळाला. एसबीआयमधून क्लार्क म्हणून निवृत्त झालेल्या जर्नादन भट्ट यांचा रेकॉर्डही उत्तम आहे.
त्यांनी समोरच्याला नेहमीच मदतीचा हात दिला. युनियन लीडर या नात्याने सहकर्माचा-यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम दान केलेली नाही. यापूर्वी भट्ट आणि त्यांच्या सहका-यांनी मिळून एका गरजवंताला 54 लाख रुपये दिले होते.