नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यावर त्यांच्यावर काँग्रेसमधून जोरदार टीका झाली होती. मात्र मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावरुन काँग्रेसचे विचार मांडल्यानं आता काँग्रेस नेत्यांनी यू-टर्न घेतला आहे. प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून संघाला त्यांच्याच व्यासपीठावरुन आरसा दाखवला, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुखर्जींनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणं काँग्रेसला फारसं रुचलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. मात्र मुखर्जींच्या भाषणानंतर काँग्रेसनं यू-टर्न घेत त्यांचं कौतुक सुरू केलं आहे. 'प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठावरुन सहिष्णूता, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता याबद्दलचे विचार मांडले. हेच विचार या देशाचा आत्मा आहेत. सार्वजनिक जीवनात हिंसा नको, मग ती कृतीतून प्रकट होणारी असो वा शब्दातून व्यक्त होणारी असो, ती टाळायला हवी. अहिंसा हाच या देशाच्या विचारांचा गाभा आहे, हा संदेश प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून दिला,' असे कौतुकोद्गार सुरजेवाला यांनी काढले. संविधानावर असलेली श्रद्धा हाच खरा राष्ट्रवाद आहे, याची आठवण प्रणव मुखर्जी यांनी संघाला करुन दिल्याबद्दल काँग्रेसनं त्यांचं कौतुक केलं. 'लोकशाहीत संवादाला सर्वाधिक महत्त्व आहे. मोकळ्या मनानं सर्वांची बाजू ऐकून घ्यायला हवी. दुसऱ्याचा मताचा आदर करायला हवा, असे विचार प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमात मांडले. संघ आणि भाजपा यातून योग्य तो बोध घेतील, अशी आशा आहे. प्रणवदांच्या मार्गदर्शनामुळे भाजपा आणि संघाच्या वर्तणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा बाळगूया,' असंही सुरजेवाला यांनी म्हटलं. त्याआधी प्रणव मुखर्जींनी संघाचं निमंत्रण स्वीकारल्यानं काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर मोठी टीका केली होती.
प्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 10:45 PM