नवी दिल्ली, दि. 2 - 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेडीयूचे नितीश कुमार कांटे की टक्कर देतील अशा ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, भाजपासोबत जेडीयूनं हातमिळवणी केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कुणाचंही आव्हान नसणार असे मानले जाते होते. मात्र नोएडातील एक युवक ही बाब स्वीकारायला तयार नाही. या युवकानं असा दावा केला आहे की, तो स्वतः 2019मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे व पंतप्रधान मोदींना तडगं आव्हान देणार आहे. इतकंच नाही तर तो स्वतःला भविष्यातील पंतप्रधानदेखील समजत आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, या युवकाचं नाव विनोद पवार असे असून तो 36 वर्षांचा आहे. विनोद पवारचा दावा हास्यास्पद असून सर्व जण त्याची खिल्लीदेखील उडवत आहेत. मात्र त्यानं ही बाब फार गंभीरतेने घेतली आहे. विनोद पवारनं असा दावा केला आहे की, कुण्या एका ज्योतिषानं अशी भविष्यवाणी केली आहे की 2019मध्ये लोकसभा निवडणुकीतील तो (विनोद) पंतप्रधान पदाचा तगडा दावेदार असेल. पवारनं तर पंतप्रधान मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःचे काही पोस्टर्सदेखील बनवले आहेत.
विनोद हा नोएडातील सेक्टर 50 मध्ये कोचिंग सेंटर चालवतो. दरम्यान, याबाबत बोलताना विनोद म्हणाला आहे की, ''देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मजुरांना किमान वेतनदेखील मिळत नाही. सीमेवर तणाव आहे. असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर उपाय आवश्यक आहे. देशात आर्थिक विकास व समृद्धी आणण्यासाठी मला पंतप्रधान व्हायचे आहे. दरम्यान, पवार दुस-यांदा राजकारणात आपले नशिब आजमावत आहे. जानेवारी 2017मध्ये पवारनं नोएडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना पवारनं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना आपला मित्र असल्याचे सांगितले होते. तर प्रस्तावक म्हणून महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासहीत अन्य स्वातंत्र्य सेनानींचीही नावं नमूद केली होती.
याच कारणामुळे विनोद पवार निवडणूक लढवू शकला नाही. स्वतःबद्दलची योग्य माहिती न दिल्याच्या कारणामुळे निवडणूक आयोगानं त्याचा उमेदवारी अर्ज रद्द केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विनोद पवारनं आक्षेप नोंदवला. ''जेव्हा माझ्याकडे स्वातंत्र्य सेनानी व विद्वानांची नावं देण्यासाठी असताना मी स्थानिक लोकांची नावं प्रस्तावक म्हणून का देऊ?'', असा प्रश्न विनोद पवारनं उपस्थित केला आहे. दरम्यान, विनोद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार की नाही, यासाठी 2019पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.