चंडीगड : आपल्या गर्लफ्रेंडऐवजी एक मुलगा चक्क मुलीच्या वेशात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात पोहोचला, मात्र परीक्षा देताना निरीक्षकांना संशय आल्याने त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना घडली, पंजाबच्या फरीदकोटमध्ये.
अंग्रेजसिंह असे या तरुणाचे नाव असून तो गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्यापूर्वी त्याने एका मुलीप्रमाणे तयारी केली होती. कपाळावर बिंदी, डोळ्यांवर लाइनर, ओठावर लिपस्टिक आणि हातात बांगड्या घातल्या होत्या. बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे आयोजित पॅरामेडिकल भरतीसाठी ही परीक्षा घेतली होती.
अंग्रेजसिंहने त्याची गर्लफ्रेंड परमजीत कौरच्या जागी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याच्याकडे बनावट मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड असल्याचे आढळून आले. बायोमेट्रिक यंत्रावर त्याच्या बोटांचे ठसे घेतले, तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आले.