नवी दिल्ली - दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.‘गेट््सनोट्स’ या ब्लॉगवर गेट््स यांनी ज्यांच्या कामाची महती जगभर पोहोचविली ते डॉ. वर्गीज प्रथमदर्शनी तुम्हाला डॉक्टर आहेत, असे वाटणारही नाही. कारण त्यांच्याकडे स्टेथोस्कोप नसतो. उलट त्यांच्या हातातील आयुधे पाहिली तर ते सूतार असावेत असे वाटते. रुग्णाचे अवयव किती प्रतिसाद देतात हे तपासण्यासाठी त्यांच्या हातात हातोडा असतो, रुग्णाच्या हाता-पायांची लांबी मोजण्यासाठी त्यांच्या गळ््यात टेप असते व कोनाचे नेमके मोजमाप करण्यासाठी त्यांच्यापाशी ‘गॉनिनोमीटर’ हे उपकरणही असते.गेट््स यांनी केलेल्या प्रशंसेविषयी प्रतिक्रिया विचारता डॉ. वर्गीज म्हणाले, कोतुक वा टिकेने व्यक्तिश: मी करीत असलेल्या कामात काहीच फरक पडत नाही. परंतु पोलिओग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी पुढे येण्यास आणखी डॉक्टरांना व तरुणांना याने प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. डॉ. वर्गीज म्हणाले की, अवयवांत आलेले व्यंग दूर करण्यासाठी थोडीफार शस्त्रक्रिया केली व भरपूर मानसिक आधार दिला की, पोलिओग्रस्त व्यक्तीही इतर कोणाहीप्रमाणे स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते व देशाच्या विकासाला हातभार लावू शकते. त्यामुळे मी एकटा करत असलेले काम पुरेसे नाही. सरकार आणि समाजाने पोलिओग्रस्तांविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. पोलिओग्रस्तांचे पुनर्वसन हा एकच ध्यास घेऊन डॉ. वर्गीज गेली नेक वर्षे काम करत आहेत. सेंट स्टीफन्स इस्पितळातील पोलिओ वॉर्डमध्ये एकही रुग्ण न येता हा वॉर्ड पूर्णपणे रिकामा पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पोलिओमुळे हात-पाय लुळे झालेल्या असंख्य स्त्री-पुरुषांच्या दृष्टीने ते जणू देवदूत आहेत. डॉ. वर्गीज यांच्यामुळे हे लोक आज कोणाच्याही मदतीशिवाय आपापले आयुष्य जगत आहेत. हे नाते कवळ डॉक्टर व रुग्णापुरते राहिले नसून ते रुग्णांच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत.पोलिओ गेला, अपंगत्व राहिलेभारतातून पोलिओचे सन २०११ मध्ये उच्चाटन झाले असले तरी त्याआधी या आजाराने अवयवांनालुळेपणा आलेले हजारो लोक आजही तयचे परिणाम भोगत आहेत.सेंट स्टीफन्स इस्पितळातील आठ खाटांचा हा पोलिओ वॉर्ड १९८७ मध्ये सुरु करण्यात आला. तेव्हा देशात पोलिओचे प्रमाण खूप होते व हा वॉर्ड बहुतांश वेळा पूर्ण भरलेला असायचा.एकेकाळी सेंट स्टीफन्समध्ये वर्षाला ६००हून अधिक पोलिओग्रस्तांवर शस्त्रक्रिया व्हायच्या. आता ही संख्या वर्षाला २०० वर आली आहे.तरी डॉ. वर्गीज यांचे रिकाम्या वॉर्डचे स्वप्न साकार व्हायला आणखी बरीच वर्षे लागतील.
तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 2:14 AM