नवी दिल्ली - लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणे म्हणजे स्वप्न साकार करणेच होय. स्वत:चे व आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवणे म्हणजे आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनने होय. नुकतेच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने अधिकारीपदाची खुर्ची काबिज केली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हेच अधिकारी उद्यासाठी प्रेरणा ठरतात. इंद्रजीत महथा यांची सत्यकथाही अशीच प्रेरणादायी आहे. देशाच्या ग्रामीण भागातील तरुणांना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना एक ऊर्जा देणारी आहे.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांच्या गावात गेल्या 5 दशकात कुणीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झाले नव्हते. मात्र, इंद्रजीत यांनी आपल्या गावातून युपीएससी परीक्षा पास होऊन गावच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. झारखंड राज्याच्या बोकारो जिल्ह्यातील साबरा नावाच्या एका खेड्यात राहणाऱ्या इंद्राने युपीएससी परीक्षेत जीत मिळवली. गावातच, मातीने बांधलेल्या कौलारू घरातच ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घराची अवस्था बिकट होती, घर पडायला आलं तेव्हा आई व बहिणी मामाकडे गेल्या. मात्र, इंद्रजीत यांनी आपल्या शिक्षणामुळे त्याच घरात राहणे पसंत केले. इंद्रजीत यांच्या मदतीने वडिलांनी घराची डागडुजी करुन घेतली. ते विटा द्यायचे तर वडिल रचून ते बांधकाम करायचे.
शाळेत शिकत असताना, जिल्हा प्रशासन या धड्यासंदर्भात त्यांनी शिक्षकांना प्रश्न केला. जिल्ह्याचे सर्वात मोठे साहेब कोण, असा प्रश्न इंद्रजीत यांनी विचारला. त्यावर, शिक्षकांनी जिल्हाधिकारी असं उत्तर दिलं. तेव्हापासून जिल्हाधिकारी कोण, त्याचे अधिकार काय, या सर्वांची माहिती घेण्याचं काम इंद्रजीत यांनी केलं आणि भविष्यात आपणासही जिल्हाधिकारीच बनायचंय, असं स्वप्न त्यांनी बाळगलं. शाळेत शिकताना नवीन पुस्तकं विकत घ्यायचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळेच जुनीच पुस्तके रद्दीच्या दुकानातून विकत घेऊन शिक्षण पूर्ण केलं.
इंद्रजीत यांनी पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली, येथूनच त्यांच्या युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. मुलाच्या दिल्लीतील शिक्षणाचा खर्च कुटुंबाला परवडणार नव्हता. त्यामुळे, वडिलांनी गावात असलेल्या जमिनीचा 80 टक्के भाग विकला. वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी जमिन विकल्याची जाणीव इंद्रजीत यांना होती. मात्र, पहिल्या प्रयत्नात इंद्रजीत यांना युपीएससी परीक्षेत अपयश आले, त्यावेळीही वडिलांनी धीर देऊन त्यांचं मनोबल वाढवलं. त्यावेळी वडिलांनी वापरलेलं वाक्य इंद्रजीत यांना खूप काही सांगून गेलं. आता फक्त शेत विकलंय, तुला शिकविण्यासाठी मी किडनीही विकू शकतो, असे इंद्रजीत यांच्या वडिलांनी म्हटले. वडिलांचे हे वाक्य ऐकून इंद्रजीत यांचे डोळे पाणावले पण आत्मविश्वास अधिक वाढला. त्यानंतर, इंद्रजीत यांनी पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला अन् दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी बनून दाखवलं. इंद्रजीत यांची ही प्रेरक सक्सेस स्टोरी गरीब घरातील विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणारी आहे.