हैदराबाद - देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याबाबत देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराची भावना असते. प्रत्येक जण आपल्यापरीने तिरंग्याचा मान वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने तिरंग्यासाठी जे काही केले ते वाचून तुम्हाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आंध्र प्रदेशमधील आर. सत्यनारायण या व्यक्तीने वैशिष्ट्यपूर्ण तिरंगा साकार करण्यासाठी आपले घर विकले आणि चार वर्षांच्या अथक मेहनतीचे हा वैशिष्ट्यपूर्ण तिरंगा तयार करण्याचे स्वप्न साकार केले. आंध्र प्रदेशमधील नागरिक असलेले आर. सत्यनारायण यांनी वेगळ्या पद्धतीने तिरंगा साकार करण्याचा निश्चय केला होता. त्यांना एकाच कपड्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शिलाई नसलेला तिरंगा तयार करायचा होता. अनेक वर्षांपासून मनात असलेला अशाप्रकारचा तिरंगा तयार करण्यासाठी साडे सहा लाख रुपयांची गरज होती. मात्र तेवढी रक्कम त्यांच्याकडे नसल्याने त्यांचे तिरंगा साकारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यात अडथळे येत होते. अखेरीस सत्यनारायण यांनी आपले घर विकून साडे सहा लाख रुपयांची रक्कम उभी केली. त्यानंतर सुमारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या मनासारखा तिरंगा साकार झाला. आठ बाय बारा फूट आकाराचा तिरंगा साकारणे हा सत्यनारायण यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. केवळ एका कपड्यावर तयार केलेला एकही तिरंगा नाही. सर्व तिरंगे हे केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांनाएकत्र शिवून तयार केले जातात, असे सत्यनारायण सांगतात. आता हा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवण्यात यावा अशी इच्छा सत्यनारायण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेसाठी विशाखापट्टणम येथे आले असताना सत्यनारायण यांनी हा तिरंगा नरेंद्र मोदींच्या स्वाधीन केला. मात्र या तिरंग्याची वैशिष्ट्ये सांगण्याची संधी त्यांना मिळाली नाही. दरम्यान, हा तिरंगा तयार करण्याची प्रेरणा मला लिटिल इंडियन नावाच्या शॉर्ट फिल्ममधून मिळाली. या शॉर्ट फिल्ममध्ये नायक तिरंग्यातील तीन रंगाना एकत्र करून तिरंगा तयार करतो.'' असे सत्यनारायण यांनी सांगितले.
तिरंग्यासाठी त्याने विकले घरदार, चार वर्षांनी झाले स्वप्न साकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:17 AM