रोहतास - बिहारमधील बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत रोहतासमधील नटवार येथील जनता हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या हिमांशू राज याने बिहार बोर्डाच्या या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. हिमांशूने एकूण ९६.२० टक्के गुण मिळवत बोर्डात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळवला.
हिमांशूचे वडील शेतकरी असून, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने हिमांशूला वडिलांना शेतीच्या कामात आणि भाजीपाला विक्री करण्यामध्ये मदत करावी लागे. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही हिमांशूने आपली मेहनत कायम ठेवली. त्याने दहावीच्या वर्षात दररोज १४ तास अभ्यास केला. अखेर त्याला या मेहनतीचे फळ मिळाले. ४८१ गुण आणि ९६.२० टक्क्यांसह त्याने बोर्डात पहिला क्रमांक पटकावला.
बोर्डात प्रथम आलेल्या हिमांशूचा अभ्यास क्लाससोबतच त्याचे वडीलही घेत असत. दरम्यान, पुढे शिकून सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचा इरादा हिमांशूने बोलून दाखवला आहे. तसेच त्यासाठी पुढेही कठोर परिश्रम करण्याची तयारी त्याने बोलून दाखवली आहे.
परीक्षेत मिळालेल्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना हिमांशूने सांगितले की, ‘’शेतीच्या कामात वडलांना मदत व्हावी म्हणून मी अनेकदा त्यांच्यासोबत भाजीपाला विक्री करण्यास जात असे. ही सर्व कामे आटोपल्यानंतर मी मन लावून अभ्यास करायचो. त्यामुळेच आज मी पहिला आलो आहे.’’