ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- लहान भावाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा भाऊ तब्बल नऊ दिवस त्या मृतदेहासोबत राहिल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. आपला भाऊ आजारी आहे आणि तो ठीक होइल, ही आशा त्या व्यक्तीने नऊ दिवस धरून ठेवली होती. करावल नगरमध्ये दोन वृद्ध भावंडं राहत होती. त्यापैकी लहान भावाचं निधन झालं. पण आपला भाऊ आजारी आहे असं मोठ्या भावाला वाटलं होतं तसंच तो लवकर बरा होइल, अशी आशाही ते बाळगून होते. भावाच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ दिवस ते मृतदेहाबरोबर राहिले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या काही ओळखीतील लोक त्यांच्या घरी आले असताना हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव राजेंद्र भटनागर असं आहे. ते 68 वर्षांचे होते. पोलिसांच्या माहितीनूसार, राजेंद्रचे मोठे भाऊ सत्तर वर्षीय प्रल्हाद भटनागर मानसिक रूग्ण आहे. भावाच्या मृत्यूनंतर ते नऊ दिवस घराच्या बाहेरही पडले नव्हते. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे
राजेंद्र त्यांचा मोठा भाऊ प्रल्हादसह करावल नगरमध्ये रहात होते. दोन्हीही भाऊ अविवाहीत होते. एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राजेंद्र घराजवळ असलेल्या लिटिल स्टार पब्लिक स्कूलमध्ये संस्कृत शिकवायचे. शाळेतून मिळणाऱ्या पगारावर या दोन्ही भावांचा उदरनिर्वाह होत होता. 23 जून रोजी राजेंद्र यांची प्रकृती बिघडल्यानंतर ते औषध घेऊन झोपले पण त्यानंतर ते उठलेच नाहीत. प्रल्हाद यांनी त्या दिवशी संध्याकाळी तसंच दुसऱ्या दिवशी त्यांना उठवायचा प्रयत्न केला होता पण राजेंद्र उठलेच नाहीत. राजेंद्र जास्त आजारी असतील असा विचार त्यांनी केला होता.
आणखी वाचा
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर 27 जून रोजी राजेंद्र शिक्षक असलेली शाळा सुरू झाली होती. 28 तारखेला राजेंद्र भटनागर शाळेत आले नाहीत म्हणून शाळेतील शिपाई चावी घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. तेव्हा राजेंद्र बीकानेरला गेले असल्याचं प्रल्हाद यांनी त्या शिपायाला सांगितलं. सोमवारपर्यंत राजेंद्र शाळेत गेले नाहीत म्हणून त्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीचंद तोमर यांनी शाळेच्या नंद कुमार आणि उत्तम कुमार या दोन शिक्षकांना त्यांच्या घरी पाठवलं होतं. शिक्षक जेव्हा राजेंद्र कुमार यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना घरातून विचित्र वास येऊ लागला. ते दोघे जण घरात गेल्यावर त्यांना बिछान्यावर राजेंद्र यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकरणी त्या शिक्षकांनी पोलिसांनी माहिती दिली. तेव्हा आपला लहान भाऊ राजेंद्र आजारी असल्याचं प्रल्हाद यांनी पोलिसांना सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी मृतदेहाचं पोस्टमार्टेम केल्यानंतर राजेंद्र यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.