नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यावर गोळी झाडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा हिंदू महासभेकडून सन्मान करण्यात येणार आहे. जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा विद्यार्थी नथुराम गोडसेंसारखा राष्ट्रवादी असल्याचं हिंदू महासभेनं म्हटलं आहे. हिंदू महासभेला गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत संघटनेचे प्रवक्ते अशोक पांडेंनी गोळी झाडणाऱ्याचं कौतुक केलं. 'जामियाच्या कॅम्पसमधून देशविरोधी कृत्यं करणाऱ्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्यानं केला. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो', अशी स्तुतीसुमनं पांडेंनी उधळली. हिंदू महासभा गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला संपूर्ण कायदेशीर मदत देणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. अशोक पांडेंनी विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबाराचं समर्थन केलं. 'त्या विद्यार्थ्यानं राष्ट्रविरोधी लोकांना धडा शिकवण्यासाठी गोळी झाडली. थंड डोक्यानं केलेल्या खुनात आणि देशहितासाठी एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यात कायदादेखील फरक करतो,' असं धक्कादायक विधान पांडेंनी केलं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ कॅम्पस, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, शाहीन बागेत आंदोलनं करणाऱ्या देशद्रोह्यांना गोळ्या घालायला हव्यात, असंदेखील ते पुढे म्हणाले. जामिया मिलिया विद्यापीठात काल विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं जमावासमोर जाऊन हातातली बंदूक दाखवली. दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशा घोषणा विद्यार्थ्यानं दिल्या. यावेळी त्यानं बंदुकीतून गोळीदेखील झाडली. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. अल्पवयीन विद्यार्थी जमावासमोर बंदूक दाखवत असताना त्याच्या मागे असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Jamia Firing: 'तो विद्यार्थी नथुराम गोडसेसारखाच, त्याचा सत्कार करणार!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:38 PM