जम्मूतील डोडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. या चकमकीत दार्जिलिंगचे रहिवासी असलेले कॅप्टन ब्रृजेश थापा हे देखील शहीद झाले. थापा कुटुंब मूळचं दार्जिलिंगमधील लेबोंग जवळील बडा गिंग येथील आहे. ब्रृजेश थापा २०१९ मध्ये लष्करात दाखल झाले होते.
राजस्थानमधील झुंझुनूच्या दोन गावातील जवान देखील शहीद झाले आहेत. अजय सिंह आणि बिजेंद्र सिंह हे शहीद झाले आहेत. भेसवत येथील रहिवासी असलेल्या अजयच्या कुटुंबीयांना मंगळवारी सकाळी ते शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारी त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात येणार आहे. थापा यांच्यामाणेच अजयचे वडील कमल सिंह हेही लष्करात होते. २०१५ मध्ये ते निवृत्त झाले.
अजय यांचे भाऊ रवींद्र म्हणाले की, "आमच्या कुटुंबातील अनेकांनी सैन्यात सेवा बजावली आहे. आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी उठलो, पण अचानक आम्हाला कळलं की अजयचा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. प्रत्येकाला देशाची सेवा करण्याचं आणि देशसेवेसाठी स्वत:चं बलिदान देण्याचं सौभाग्य मिळत नाही."
बिजेंद्र सिंह यांच्याबाबत माहिती मिळताच झुंझुनू येथील डुमोली कलां या गावातील ढांडीमध्ये शोककळा पसरली आहे. बिजेंद्र सिंह २०१८ मध्ये लष्करात दाखल झाले आणि त्यांना दोन मुलं आहेत. फेब्रुवारीमध्ये ते एकदा गावात आले होते. ते शहीद झाल्याची माहिती सर्वप्रथम बिजेंद्र यांचे भाऊ दशरथ सिंह यांना देण्यात आली.
बिजेंद्र सिंह यांचे वडील रामजी लाल म्हणाले, "माझी दोन्ही मुलं देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात आहेत. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे, पण मी सरकारला दहशतवाद संपवण्याची विनंती करतो. मी मुलगा गमावणं हे माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे. सर्वात मोठं नुकसान आहे. ."
शहीद झालेले चौथे जवान राजेश होते. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमच्या संथाबोम्मली मंडळातील चेतलातंद्रा गावचा रहिवासी होता. एका गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार, राजेश सामान्य कुटुंबातील आहे. राजेश आणि त्याच्या धाकट्या भावाला शिक्षण देण्यासाठी कुटुंबाने खूप संघर्ष केला. तो सहा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता. तो आपल्या पगाराचा काही भाग आपल्या गावातील गरीब विद्यार्थ्यांची फी भरण्यात खर्च करत असे."