नवी दिल्ली : अंदमान-निकोबारच्या अतिदुर्गम उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासींनी धनुष्यबाणाने हत्या केलेला अमेरिकी पर्यटक जॉन अॅलन चाऊ ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठीच तेथे गेला होता हे त्याने अमेरिकेतील पालकांना पाठविलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.चाऊ याने १६ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र ब्रिटनमधील ‘दी डेली मेल.कॉम’ या आॅनलाइन वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रात जॉन याने पालकांना उद्देशून लिहिले होते, ‘...प्राण धोक्यात घालून माझे येथे येणे तुम्हाला वेडेपणाचे वाटेलही; पण या लोकांना (सेंटिनेल आदिवासींना) येशूचा संदेश पोहोचविण्यासाठी हा धोका पत्करायलाच हवा, असे मला वाटते. हे करताना माझे प्राण गेले, तर त्यांच्यावर (आदिवासींवर) किंवा देवावर रागावू नका!’‘...मी जे करतो आहे ते निरर्थक नाही. हा आदिवासींच्या सुखी आयुष्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या भाषेत प्रभूची उपासना करावी, असे बायबलमध्ये म्हटले आहे. हे आदिवासीही त्यांच्या भाषेत प्रभूची प्रार्थना करताना पाहण्यासाठी मी उतावीळ झालो आहे,’ असेही त्याने पत्रात म्हटले आहे. कुटुंबियांनी लिहिले की, इतरांसाठी तो ख्रिश्चन मिशनरी असला तरी आमच्यासाठी तो प्रिय होता.मृत्यूपूर्वी लिहिली टिपणेजॉनला या बेटावर जाण्यासाठी मदत केल्याबद्दल ज्या मच्छीमारांना अटक केली आहे त्यांच्याकडे जॉनने स्वत:च्या हस्ताक्षरांत लिहिलेली काही टिपणेही मिळाली आहेत.त्यावरून असे दिसते की, ठार मारले त्याच्या आदल्या दिवशीही जॉन, एका हातात मासा व दुसऱ्या हातात बायबल घेऊन बेटावर गेला होता व त्याही वेळी आदिवासींनी त्याच्यावर धनुष्यबाणाने हल्ला केला होता. त्याचे वर्णन जॉनने या टिपणांमध्ये केले आहे.
‘तो’ अमेरिकी गेला होता धर्म प्रचारासाठीच; पालकांना लिहिलेल्या पत्रावरून झाले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:22 AM