- शीलेश शर्मा, नवी दिल्लीदोन वर्षांनी म्हणजे २0१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांंमध्ये भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याजी तयारी सुरू झाली असून, त्याचाच भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अलीकडेच भेट घेतली. मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे १0 मार्च रोजी राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली.या बैठकीत नेमके कोणते विषय चर्चिले गेले, याबाबत गुप्तता पाळण्यात आली. मात्र मोदी व भाजपाच्या विरोधातील लढाईत शरद पवार यांनी सहकार्य करावे, अशी विनंती राहुल यांनी केल्याचे समजते. त्यावर देशातील सर्व विरोधी नेत्यांशी आपण महाआघाडी बनवण्याबाबत चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी शुक्रवारी सांगितले की, मोदी सरकारविरोधात महाआघाडी बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी २0१९ पर्यंत थांबण्याची गरज नसून, राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्तानेच ही तयारी करायला हवी. त्रिपाठी यांनी राहुल व पवार यांच्या भेटीविषयी माहिती नसल्याचे सांगितले. सर्व नेते भेटणार...सोनिया गांधी उपचारांसाठी परदेशात गेल्या असून, राहुल गांधीही त्यांच्या मदतीसाठी कालच तिथे गेले आहेत. भारतात परतल्यावर ते ममता बॅनर्जी, नितीश कुमार, लालुप्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
मोदी सरकारविरोधात महाआघाडी करणार
By admin | Published: March 18, 2017 1:20 AM