तिरूवनंतपुरम - केरळचे प्रसिद्ध शबरीमला मंदिरामध्ये बुधवारी (2 जानेवारी) दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. या घटनेनंतर येथील मुख्य पुजाऱ्यानं सर्व भक्तांना तेथून बाहेर काढून, शुद्धीकरणासाठी एक तासभर मंदिर बंद केले होते. शुद्धीकरण प्रकरणावर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी जाहीररित्या नाराजी करत प्रतिक्रिया दिली की, महिला प्रवेशासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय अय्यप्पा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना स्वीकारायचा नव्हता, तर त्यांनी आपलं पद सोडायला हवे होते.
दरम्यान, पक्षकारांमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांचाही समावेश असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देण्यापूर्वी त्यांचीही बाजू विचारात घेतली होती, याची आठवणदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी करुन दिली.
'आरएसएस केरळला वॉर झोन बनवतंय'राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरुन मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, आरएसएसनं केरळला वॉर झोन बनवून ठेवलं आहे. अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांना सरकारचा विरोध आहे.. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय लागू करण्याचा निर्णय घेत आहोत. दरम्यान, या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत सात पोलीस वाहनं, 79 सरकारी बस आणि 39 पोलीस कर्मचाऱ्यांवर निशाणा साधण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली.
अय्यप्पा मंदिरा प्रवेश करणाऱ्या महिला कोण?
कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलाभक्तांची नावे आहेत. पारंपरिक पद्धतीचे काळ कपडे परिधान करुन या महिलांनी बुधवारी पहाटे 3.38 वाजण्याच्या सुमारास अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. दर्शनानंतर कनकदुर्गा आणि बिंदू या दोघींना पोलीस संरक्षणात अज्ञात स्थळी नेण्यात आले. बिंदू प्राध्यपिका आणि कोळीवाडा येथील कम्युनिस्ट कार्यकर्त्या असून, त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कनकदुर्गा यां मल्लपूरम येथे नागरी पुरवठा खात्यात कर्मचारी आहेत.
620 किमी लांबीची महिला साखळी
या महिलांनी यापूर्वीही मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना अडवण्यात आले होते. संतप्त भक्तांच्या निदर्शनांमुळे न्यायालयाचा निकाल अंमलात येऊ शकला नव्हता. दर्शनासाठी आलेल्या महिलांना भक्तींनी पिटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर, लैंगिक समानता आणि प्रागतिक मूल्यांच्या रक्षणासाठी केरळमध्ये मंगळवारी 620 किमी लांबीची महिला साखळी गुंफण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलांनी अय्यप्पा मंदिरातील प्रवेशबंदी झुगारुन दिली.
त्या महिला माओवादी - भाजपा नेते
या घटनेबाबत भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ''ज्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश केला, त्या भाविक नसून माओवादी होत्या'', असे वादग्रस्त विधान भाजपाचे नेते व्ही मुरलीधरन यांनी केले आहे. मुरलीधरन पुढे असेही म्हणाले की, निवडक पोलिसांना हाताशी घेऊन कम्युनिस्ट पार्टीनं महिला मंदिर प्रवेशाची योजना आखली, तेव्हाच या महिलांनी मंदिरात प्रवेश केला. केरळ सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीनं आखलेले हे सुनियोजित असे षड़यंत्र आहे. भाजपाच्या नेत्याच्या या विधानामुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा केरळमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने आणि राष्ट्रीय महामार्गांवर रास्तारोको सुरू आहे.
काय आहे घटना?शबरीमला येथील भगवान अय्यप्पांच्या मंदिरात शतकानुशतके 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी होती. पण सर्वोच्च न्यायालयानं 28 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय देत सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाची परवानगी दिली होती. यानंतर, राज्य सरकारला या निर्णयाचे पालन करण्याचे आदेशही दिले होते. पण काँग्रेस, भाजपासहीत हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णया तीव्र विरोध दर्शवला होता.