- अपर्णा वेलणकर डिग्गी पॅलेस, जयपूर : कहानीमे गाने होते है, और उन नज्मोंके पीछे कहानीया होती! मै चाहू, तो भी ना बता पाऊ की क्या बितती है, जब मै फिल्मोंके लिए गाने लिखता हूं... लेकिन इतना जरूर है, की मै चाहता हूं, मेरे गाने के छिलके निकाले जा सके!उपरका छिलका निकाले, तो अंदर कुछ और मिले...’निर्मितीचे मर्म उलगडण्याचा प्रयत्न गुलजार करत होते. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलला उसळलेली प्रचंड गर्दी ते मखमली अस्तराचे प्रांजळ मनोगत ऐकत होती!चाल आधी येते की शब्द? सांगीतल्याबरहकूम गाणे लिहिणे ही कवीसाठी शिक्षा नसते का? तुम्हाला संगीतकारांसाठी पुन्हा पुन्हा लिहावे-बदलावे लागते का?- असे प्रश्न चर्चेचे सूत्रसंचालक संजोय गुप्ता यांनी विचारले तेव्हा गुलजार हसून म्हणाले, ‘मी गेली दोनशे वर्षे हेच तर सांगतो आहे, की सिनेमासाठी लिहिताना चाल आधी येते आणि मग शब्द. सिनेमात जिथे गाणे असणार त्या प्रसंगाची पार्श्वभूमी, जे पात्र ते गाणार त्याचे व्यक्तिमत्वव भाषा हे लक्षात घ्यावे लागतेच. शब्दांना स्वर मिळतात, त्या गणितानुसार पुन्हा पुन्हा लिहावे लागतेच. त्यात काय बिघडले? ...आपने जो लिख दिया, जरा मुडके देखे तो की क्या लिखा है!! तुम्हालाच एखादा शब्द बदलावा वाटेल, एखादी ओळ पुन्हा रचावीशी वाटेल!!’’रहमान, विशाल भारद्वाज अशा प्रतिभाशाली संगीतकारांबरोबर काम करण्याचे अनुभव गुलजार यांनी सांगितले. दहा शिव्याशिवाय म्हणणे मांडूच शकणार नाही, अशा मुलीच्या व्यक्तिरेखेसाठी गाणे लिहायचा प्रसंग आला, तेव्हा ‘जा पडोसीके चुल्हेसे आग लै ले’- चा तिरका, थेट ठसका आपसूक आला असे गुलजार म्हणाले, तेव्हा ‘बिडी जलाईले’च्या तिखट चटक्याने सारेच घायाळ झाले होते.तुमचे उर्दूवर अधिक प्रेम आहे, असे म्हणताच गुलजार यांनी दोन भाषांचे मीलन किती स्वाभाविक असते याची उदाहरणे दिली. ते गंमतीत म्हणाले की उजवीकडून डावीकडे लिहिले की हिंदी असते व डावीकडून उजवीकडे लिहिले तर उर्दू!सध्याच्या गाण्यांमध्ये शिव्या व गलिच्छ शब्दांचा वापर असतो, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का? तेव्हा गुलजार म्हणाले, तरुण पिढी भाषेशी खेळणार, हे स्वाभाविकच. त्यांच्या भाषेची मला काळजी आहेच, पण भाषेच्या संपन्नतेचा वारसा ज्येष्ठ पिढीकडून येतो. हल्ली ज्येष्ठ लोक चारचौघात वापरतात त्या भाषेतली उद्धट हिंसा मला चिंतित करते. आप दोस्तीकी बात कर रहे हो या दुश्मनीकी, जब बात करे तो शब्दोंका प्रयोग जरा संभालके करे. इतनाही मै चाहूंगा!उषा उथुप यांच्या सळसळत्या गायनाने महोत्सवाचा दुसरा दिवस सुरू झाला. दिवसभर चर्चा व परिसंवादांची रेलचेल होती.>‘आंधी’ : तेव्हा आणि आत्ता!इतक्या वर्षांपूर्वी तुम्ही तत्कालीन राजकीय वातावरणावर ‘आंधी’ हा चित्रपट केला होता, आजचे वातावरण तर त्याहून अधिक बिघडलेले आहे. ‘आंधी’ चा दुसरा भाग बनवावा असे तुम्हाला आत्ता वाटते आहे का?- असा थेट प्रश्न प्रेक्षकांंमधल्या गृहस्थांनी केला. त्यावर गुलजार म्हणाले, ती माझ्या काळाची कहाणी होती. आजच्या काळाची कहाणी वेगळी आहे, ती आजच्या तरुण लेखक-दिग्दर्शकांनी पडद्यावर आणावी. कहानी आज की है, तो आज जिनका है, उन्हें ये सवाल पुंछिंये!
...जिन के सर हो इश्कही छाँव, पाँव के निचे जन्नत होगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:27 AM