ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - देशातील 7 कोटी लोक डायबेटीसच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 2014 मध्ये 6.68 कोटी तर 2015 मध्ये 6.91 कोटी लोकांना डायबेटीज होता. 20 ते 70 वयोगटातील लोकांची तपासणी केली असता ही माहिती समोर आली होती. आता मात्र हा आकडा 7 कोटींच्या जवळ गेला असल्याचं आंतरराष्ट्रीय डायबेटीस फेडरेशनने सांगितलं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी राज्यसभेत लेखी उत्तररातून दिली आहे.
लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या लेखात डायबेटीस रुग्णांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागत असल्याच म्हटलं आहे. या यादीत पहिल्या तीन देशांमध्ये भारतासह चीन आणि अमेरिकेचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात चीनने भारताला मागे टाकले आहे. चीनमध्ये सर्वात जास्त 10 कोटी डायबेटीस रुग्ण आहे. त्यानंतर भारत दुस-या क्रमांकावर असून अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 29 कोटी डायबेटीस रुग्ण आहेत.
गेल्या काही वर्षात महिलांमधील डायबेटीसचे प्रमाणदेखील वाढत आहे. 1980 ते 2014 दरम्यान महिलांमधील डायबेटीसचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढलं आहे. कर्करोग, डायबेटीस आणि हृदयासंबंधी आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय कार्यक्रम आखत असल्याची माहिती जे पी नड्डा यांनी दिली आहे. वेगाने वाढणारे डायबेटीसचे रुग्ण ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. 2015 मध्ये डायबेटीसमुळे 1 लाख 27 हजार 911 लोकांचा मृत्यू झाला आहे. डायबेटीसवर नियंत्रण नाही आणलं तर 2030 पर्यंत रुग्णांचा आकडा 10 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.