नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) शुक्रवारी जाहीर केले. या भागामध्ये मंगळवारी, ५ नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे.
या भागामध्ये प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळ्याच्या मोसमात फटाके फोडण्यासही ईपीसीएने बंदी घातली. यासंदर्भात या संस्थेचे अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिल्ली, एनसीआर या भागांमध्ये गुरुवार रात्रीपासून प्रदूषणाने अतिधोकादायक स्तराची पायरीही ओलांडली आहे. त्यामुळे दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नॉयडा, ग्रेटर नॉयडा या भागांतील बांधकामे, हॉट मिक्स प्लांट, स्टोन क्रशर येत्या मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात यावेत.
दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याबरोबरच शुक्रवारी सकाळपासून धुक्याचा दाट थर पसरला होता. शुक्रवारी दुपारी एक वाजता दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) ४८० इतका म्हणजे धोकादायक स्तरापर्यंत होता. याआधी ईपीसीएने दिल्ली-एनसीए परिसरात उद्या, शनिवारपर्यंत संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी १० वाजेस्तोवर कोणतेही बांधकाम करण्यास बंदी घातली होती. या परिसरातील कोळसा व अन्य इंधनांवर चालणारे, तसेच उत्पादन प्रक्रियेत नैसर्गिक वायूचा वापर न करणारे उद्योग ५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेशही ईपीसीएने दिला आहे.शाळाही बंद राहणारदिल्लीमध्ये प्रदूषण अति प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंगळवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश ईपीसीएने दिला आहे. प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत नागरिकांनी खुल्या जागेत व्यायाम करू नये, असेही ईपीसीएने म्हटले आहे.