नवी दिल्ली: कोरोनावरील लस दिल्लीतच नव्हे, तर देशातही मोफत मिळेल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. मात्र अवघ्या तासाभरानंतर त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे संभ्रम वाढला आहे. त्यामुळे कोरोना लस मोफत मिळणार की त्यासाठी पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना कोरोनावरील लसीच्या शुल्काबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी केवळ दिल्लीच नाही, तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असं सांगितलं. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे कोरोनावरील लसीकरणाबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. मात्र यानंतर अवघ्या तासाभरात हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटनं सगळ्यांनाच संभ्रमात टाकलं.
सर्व नागरिकांना मोफत मिळणार नाही कोरोना लस?; आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या 'त्या' ट्विटनं वाढला संभ्रम
By कुणाल गवाणकर | Published: January 02, 2021 1:37 PM