नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात 2902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 68 जणांचा मृत्यू झाला, तर 183 जण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती, आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
42 टक्के लोक 21-40 वर्ष वयोगटातील -अग्रवाल म्हणाले, कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 9 टक्के रुग्ण 0-20 वयोगटातील आहेत, 42 टक्के लोक 21-40 वर्ष वयोगटातील आहेत. 33 टक्के लोक 41-60 वर्ष वयोगटातील आहेत. तर 17 टक्के लोक 60 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. आतापर्यंत देशात 2,902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारपासून ते आतापर्यंत एकूण 601 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत आणि 12 जणांचा मृत्यूही झाला आहे.
कोरोना झालेल्यांपैकी 58 जण अत्यवस्थ -कोरोनाची लागण झालेल्यांपैकी तब्बल 58 रुग्ण सध्या अत्यवस्थ आहेत. हे सर्वजण केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील आहेत. ज्या 17 राज्यांत तबलीगी जमातशी संबंधित कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तेथे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईसाठी जागरूक होण्याची आवश्यता आहे. आम्ही कोरोना टेस्टिंगची क्षमता सातत्याने वाढवत आहोत, असे अग्रवाल म्हणाले.
तबलिगी जमातशी संबंधित 22 हजार जण क्वॉरंटाईनमध्ये -गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले, की तबलिगी जमातचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.