नवी दिल्ली : जगातील जवळजवळ सर्वच देश कोरोना संकटाचा पूर्ण शक्तीनिशी सामना करताना दिसत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि टेस्टिंग या दोनच पद्धती सध्या संपूर्ण जगात वापल्या जात आहेत. लॉकडाऊन करून भारताने कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर रोखला आहे. आता भारत टेस्टिंगवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. मे महिन्यापासून भारत दर महिन्याला जवळपास 20 लाख कोरोना टेस्टिंग किट्स तयार करण्यासाठी सक्षम होईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या 20 लाखपौकी 10 लाख किट्स रॅपिड अँटीबॉडी असतील तर 10 लाख आरटी-पीसीआरच्या असतील. यामुळे भारतावरील किटच्या आयातीचा बोजा कमी होईल. देशात सध्या 6 हजार व्हेंटिलेटर तयार केले जात आहेत. ही संख्याही पुढे चालून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढेच नाही, तर पुढील काळात पीपीई आणि ऑक्सिजन डिव्हाईस सारख्या गोष्टीही 'मेक इन इंडिया'च्या धरतीवर तयार करण्याची तयारही भारताने सुरू केली आहे.
मोदी सरकार राज्यांच्या साथीने कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढविण्यावरही काम करत आहे. देशात शुक्रवारपर्यंत 1919 कोरोना रुग्णालये होती. यात 672 रुग्णालये गंभीर रुग्णांसाठी तर 1247 रुग्णालये मॉडरेट लक्षणे दिसणाऱ्यांसाठी आहेत. देशात सध्या 1,73,746 आयसोलेशन वॉर्ड, 21,806 आयसीयू बेड्स तयार आहेत. आतापर्यंत 5 लाख रॅपिड किट्स चीनमधून भारतात पोहोचल्या आहेत. त्या राज्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 13.6 टक्क्यांवर -
लॉकडाऊनमुळे भारतातील कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनपूर्वी केवळ 3 दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. आता 6.2 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होते. काही राज्यांमध्ये मोठी सुधारणा दिसत असून त्यात केरळ, ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील 13.6 टक्क्यांवर पोहोचले असल्याची सकारात्मक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी अधोरेखित केली.