विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीतील आरोग्यव्यवस्था कोलमडली असून, रुग्णांना खाटा नाहीत, अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि जिकडे- तिकडे अॅम्ब्युलन्सचा सायरन कानावर धडकत असल्याने दिल्लीकर हादरले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्लीतील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत; परंतु आरोग्यसेवा किती विस्तारित करायच्या याला मर्यादा आहेत. दिल्लीतील सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नाहीत. उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या आकड्यांनुसार २८ हजार ३९५ रुग्णांची नोंद झाली, तर २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.मागच्या वर्षी दिल्लीत लॉकडाऊननंतर मजूर त्यांच्या गावी गेले. जे थांबले त्यांना ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. आता पुन्हा दिल्ली सरकार ५ हजार रुपयांची मदत करणार आहे. शिवाय, शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या मध्यान्ह जेवणाचा वापर मजुरांसाठी केला जाईल.
उद्योगपतींचा फायदा : राहुल गांधीकेंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. ‘लसीकरणाच्या धोरणामुळे काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार असल्याचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले. केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटाबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमावणार आणि या धोरणामुळे काही उद्योगपतींचा मात्र फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.