नवी दिल्ली :
नवीन प्रकरणांची यादी खंडपीठांसमोर सुनावणीसाठी स्वयंचलित पद्धतीने यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांना दिले आहेत, त्यामुळे नवे खटले आपोआप खंडपीठापुढे येतील, अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी दिली.
न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्यासमवेत खंडपीठावर बसलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, ‘मी निबंधकांना निर्देश दिले आहेत की सोमवार, मंगळवार आणि बुधवारपर्यंत नोंदणी केलेले सर्व खटले पुढील सोमवारपर्यंत सूचीबद्ध करावेत. त्यामुळे, स्वयंचलित तारीख दिली जाईल. एक स्वयंचलित सूची तयार होईल. त्यामुळे एक शिस्तबद्धपणा सुनावणीच्या तारखांमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी बुधवारी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी मंगळवारी पद सोडलेल्या न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्याकडून पदभार स्वीकारला.
‘तातडीची गरज असल्यास आम्ही आहोत’‘कोणाला काही तातडीची गरज असल्यास, आम्ही येथे नोंद घेण्यासाठी आहोत. अन्यथा, आम्ही या निर्देशांसह क्रमवारी लावू शकतो,’ असे तात्काळ सूचीत प्रकरण यावे यासाठी रांगेत उभे असलेल्या वकिलांना त्यांनी सांगितले.