दि हेग/ नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर सोमवारी, १५ मे रोजी दि हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारत व पाकिस्तान आपापली बाजू मांडणार असून, या न्यायालयात दोन्ही देश १८ वर्षांनंतर पुन्हा आमने-सामने येत आहेत. या आधी पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान भारताने कच्छच्या रणात पाडले, तेव्हा पाकिस्तानने ६० दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या न्यायालयात दावा कला होता. तो १४ विरुद्ध २ अशा बहुमताच्या निकालाने फेटाळला गेला होता. नेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल आॅफ जस्टिसमध्ये ही सुनावणी होणार आहे. भारताने याबाबत ८ मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने १६ वेळा विनंती केली होती, पण परराष्ट्र नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने मागणी फेटाळली असेही भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. १० आॅगस्ट १९९९ रोजी भारताने कच्छच्या रणात पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान पाडले होते. यात नौदलाचे १४ जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पाकिस्तानने ६० दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या न्यायालयात दावा केला होता. २१ जून २००० रोजी १६ न्यायाधीशांच्या पीठाने १४ विरुद्ध २ अशा बहुमताने हा दावा फेटाळला होता.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आज सुनावणी
By admin | Published: May 15, 2017 5:50 AM