नवी दिल्ली : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीसाठी न्या. एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले असून ते येत्या १ आॅक्टोबरपासून (मंगळवार) सुनावणी सुरु करेल.न्या. रमणा हे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. शरद बोबडे यांच्या नंतरचे तिसºया क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश व न्या. बोबडे अयोध्या वादाची सुनावणी करणाºया घटनापीठावर असून ती दैनंदिन सुनावणी १८ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. एवढेच नव्हे तर त्या घटनापीठास सरन्यायाधीश १९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होण्याआधी अयोध्या प्रकरणाचा निकालही द्यावा लागणार आहे. शिवाय जम्मू-काश्मीरचे विभाजन ३१ आॅक्टोबरपासून प्रत्यक्षात लागू होणार असल्याने त्याच्या वैधतेचा निर्णयही त्याआधी होणे गरजेचे आहे. हे सर्व विचारात घेऊन न्या. रमणा यांचे हे घटनापीठ स्थापन केले गेले आहे.
काश्मीरसंबंधी याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 5:06 AM