लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): मराठा आरक्षणावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. ६ डिसेंबर रोजी ही याचिका सरन्यायाधीशांच्या कक्षात झालेल्या सुनावणीदरम्यान विचारात घेण्यात आली होती. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता.
महाराष्ट्र शासनाविरुद्ध जयश्री पाटील आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री पाटील प्रकरणातील दोन क्युरेटिव्ह याचिका एकत्र करून ६ डिसेंबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कक्षात न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना आणि न्या. भूषण गवई यांच्या निर्णयार्थ ठेवण्यात आल्या होत्या.
क्युरेटिव्ह याचिकेवरील न्यायमूर्तींच्या कक्षात होणाऱ्या सुनावणीत याचिका फेटाळण्याचा, नोटीस बजावण्याचा किंवा खुल्या न्यायालयात सुनावणी करण्याचे पर्याय असतात. यापैकी कोणत्याही पर्यायाचा अवलंब करण्यात आलेला नाही. न्या. संजय किशन कौल निवृत्त झाल्यामुळे या क्युरेटिव्ह याचिकेवर नव्याने सुनावणी होणार आहे. २४ जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या कक्षात सुनावणी होऊन त्यावर निर्णय घेतला जाईल.