नवी दिल्ली : जून २०२२ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला ‘खरा राजकीय पक्ष’ घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. ठाकरे गटाने सोमवारी दाखल केलेली याचिका १९ जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाला ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या शुक्रवारऐवजी पुढील आठवड्यात सोमवारी सुनावणी घेण्याचे आवाहन केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केले. १५ जानेवारी रोजी ठाकरे गटाने वकील रोहित शर्मा यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन १० जानेवारी रोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला ‘खरा राजकीय पक्ष’ म्हणून घोषित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 6:50 AM