नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदोलन सुरु आहे. उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.
शाहीनबागध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये दिल्लीला नोएडाशी जोडणारा महच्वाचा रस्ता आंदोलनामुळे बंद असल्याचे सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारकडे अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली होती. तसेच आंदोलनामुळे सामान्या नागरिकांना त्रास होऊ नये व सार्वजनिक रस्ते बंद करणं योग्यं नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय शाहीनबाग आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांबाबत काय निर्यण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शाहीनबागमधील आंदोलक रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलकांनी अमित शहा यांची वेळ घेतलेली नसल्यानं पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आला होता.