ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी टळली. या याचिकेमधून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राय बरेली मतदारसंघातून सोनिया गांधीच्या झालेल्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे.
सोनिया गांधीचे नागरिकत्व आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी खेळलेल्या जातीय कार्डाला आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, अशाच प्रकारच्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायायलयाचे सात सदस्यीय घटनापीठ सुनावणी करत आहे. त्यामुळे या याचिकेवर सध्या सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही असे सांगत, न्यायमूर्ती ए.आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी टाळली.
"अशाच एका प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल आधी येऊ दे. त्यानंतर आम्ही या प्रकरणाची सुनावणी घेऊ. सध्यातरी या प्रकरणी आम्ही कोणताही निर्णय देऊ शकत नाही. अशाच प्रकारच्या खटल्यात मोठ्या पीठासमोर सुनावणी सुरू असताना आम्हीही सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही," असे दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ म्हणाले.
यावर्षी 11 जुलै रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याखाली दाखल करण्यात आलेली सोनिया गांधी यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.