मुंबई : सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला सोहराबुद्दिनचा भाऊ रुबाबुद्दिन शेख व सीबीआयने उच्च न्यायालयात अपील केले आहे. या अपिलांवरील सुनावणी जूनमध्ये घेऊ, असे न्या. सांब्रे यांनी बुधवारी सांगितले.रुबाबुद्दिन शेख व सीबीआयने केलेल्या अपिलावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना अचानकपणे न्यायाधीशांच्या असाइनमेंट बदलण्यात आल्या. त्यामुळे या अपिलांवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडून न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठापुढे लावण्यात आल्या. बुधवारच्या सुनावणीत न्या. सांब्रे यांनी या अपिलांवरील सुनावणी जूनमध्ये घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणात आरोपमुक्त केलेले माजी आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांनी कॅनडाला जाण्याची परवानगी मिळावी, याकरिता केलेल्या अर्जावरही तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.९ फेब्रुवारीपासून न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी या अपिलांवर दैनंदिन सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. सुनावणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर अचानकपणे असाईनमेंट बदलल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्या वेळी उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी हे नित्याचे काम असल्याचे सांगितले होते. सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरण आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा, दिनेश एम. एन. आणि राजकुमार पांडीयन यांना विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपमुक्त केले. त्याला रुबाबुद्दिनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
रुबाबुद्दिनच्या अपिलावर जूनपासून सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:04 AM