ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर उद्या मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
नीट परीक्षेला विविध राज्यांनी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला आहे. नीट परीक्षेची सक्ती मागे घ्यावी यासाठी विविध राज्य आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेरविचाराच्या याचिका फेटाळून लावत आपण निर्णय कायम ठेवला होता. महाराष्ट्र सरकारकडून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएचसीईटी प्रवेश परीक्षा पाच मे रोजी घेतली जाणार आहे. राज्य सरकारचा नीटला विरोध आहे.
नीट विरोधातील सर्व याचिकांवर अनिल आर दवे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठ दुपारी दोन वाजता सुनावणी करेल असे सरन्यायाधीश पी.एस.ठाकूर यांनी सोमवारी सांगितले. नीट परीक्षेचा पहिला टप्पा रविवारी झाला. दुसरा टप्पा २४ जुलैला होणार आहे.
विनोद तावडे दिल्लीत
राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे दिल्लीत असून, ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात नीट लागू करू नये अशी विनंती ते करणार आहेत.