देशात गेल्या काही महिन्यांत हार्ट अटॅकने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भयावह बाब म्हणजे हार्ट अटॅकने जीव गमावलेल्या या लोकांपैकी बहुतांश तरुण होते. गुजरातमधील अरावलीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे क्रिकेट खेळत असताना एका 20 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीतील मोडासा येथील दीप परिसरात गोवर्धन सोसायटीच्या तीर्थ अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबातील 20 वर्षांचा मुलगा पर्व सोनी क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅकमुळे खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तो इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून रडून रडून सर्वांचीच अवस्था वाईट झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी सुरेंद्र नगर येथील पाटडी येथे शहर भाजपाचे उपाध्यक्ष व नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजूभाई ठाकोर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. मित्रांशी बोलून राजूभाई ठाकोर रात्री उशिरा घरी पोहोचले. यानंतर त्यांच्या हातात वेदना सुरू झाल्या. ते औषध घेण्यासाठी बाईकवरून सरकारी रुग्णालयात गेले. पण हार्ट अटॅक आल्याने ते हॉस्पिटलच्या बाहेर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
राजकोटमध्ये एका 50 वर्षीय महिलेचा मुलाच्या लग्नाच्या दिवशी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली. मुलगा फक्त 19 वर्षांचा होता. तेलंगणात एका आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची ही चौथी घटना आहे. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. 20 फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात नवरदेवाला हळद लावणारा एक व्यक्ती अचानक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.