मुंबई : हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटसाठी १ एप्रिलपासून जवळपास १,२00 रुपये जास्त मोजावे लागत आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग आॅथॉरिटीने हा निर्णय जाहीर केला आहे.
ताण, नोकरीतील चिंता, बदललेली जीवनशैली, खाण्यातील बदल, फास्टफूड, व्यायामाचा अभाव आदींमुळे हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यातून रक्तदाबासारखी कायमस्वरूपी व्याधी निर्माण होते. त्यातून हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तातडीचे उपचार म्हणून अँजिओप्लास्टी केली जाते. त्यावेळी स्टेंट बसविण्यात येतात. ‘एनपीपीए’चे पंकज कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नव्या आर्थिक वर्षांत स्टेंटदेखील महाग झाले असून, त्यांच्या किमती ४.२६ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच हा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ती नियंत्रित करण्यात आली होती. नव्या किमतीनुसार बेअर मेटल स्टेंटची किंमत ८ हजार २६१ रुपये, ड्रग्ज एल्युटिंग स्टेन्टची किंमत ३0 हजार रुपये करण्यात आली आहे.
स्टेंटच्या किमतीचा वादगेल्या चार वर्षांत स्टेंटच्या किमती तुलनात्मकदृष्ट्या सहा टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा औषध कंपन्या करत आहेत, तर दुसरीकडे याच काळात औषध व उपचारांचा खर्च चार ते आठ टक्क्यांनी वाढला, असा युक्तिवाद कंपन्यांनी केला आहे.उपकरणांच्या किमती चार वर्षांत कमी झाल्या, पण डॉक्टरांची फी, रुग्णालयाचा इतर खर्च यामुळे एकूणच वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झालेला नाही, असे औषध कंपन्यांचे म्हणणे आहे.