ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - महत्त्वाच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि औषधांसाठी रुग्णांकडून अवास्तव रक्कम उकळण्यात येत असते. आता या नफेखोरीला लगाम घालण्यासाठी ह्रदय तसेच इतर शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या कॉरनरी स्टेंटच्या किमतींमध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. स्टेंटच्या किमतीत सुमारे 85 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता धातूच्या स्टेंट 7 हजार रुपयांना तर ड्रग इल्युट स्टेंट 29 हजार 600 रुपयांना मिळू शकेल.
नॅशनल फार्मास्युटिलक प्रायसिंग अॅथॉरिटी (NPPA) ने या संदर्भात एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार सरकारने स्टेंटच्या किमती निश्चित केल्या आहेत. बायपास सर्जरी आणि मुत्रपिंडाशी संबंधित असलेल्या समस्यांमध्ये स्टेंटचा वापर होत असतो. मात्र बेसुमार नफेखोरीमुळे रुग्णांकडून या स्टेंटसाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली जाते.
प्राप्त आकडेवारीनुसार स्टेंटच्या विक्रीमध्ये सर्वोधिक नफा रुग्णालये वसूल करतात. स्टेंटच्या विक्रीतील जवळपास 654 टक्के नफा रुग्णालयांच्या खिशात जात असतो. गेल्यावर्षी जुलै महिन्यात कॉरनरी स्टेंटचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत करण्यात आला होता. तर डिसेंबरमध्ये औषध किंमत नियंत्रण निर्णय 2013मध्ये स्टेंलला समाविष्ट करण्यात आले.