चेन्नई : येथील डॉ. संजय चेरियन या वैद्यकतज्ज्ञाने सजीव प्राण्यांच्या पेशींपासून नवीन प्रकारची हृदयाची झडप तयार केली असून, तिची थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे एक प्रतिकृतीही बनविली आहे. हे संपूर्ण स्वदेशी संशोधन असून, हृदयाच्या झडपा बदलण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये या नव्या झडपेमुळे क्रांती येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
सध्या धातूने किंवा अन्य घटकांपासून बनविलेल्या हृदयाच्या नव्या झडपा शस्त्रक्रियेद्वारे खराब हृदय झडपांच्या जागी बसविल्या जातात. डॉ. संजय चेरियन यांनी सांगितले की, मानवी पेशींशी साधर्म्य असलेल्या प्राण्याच्या पेशींपासून हृदयाच्या नवीन झडपा बनविण्यात आल्या आहेत. हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये या नवीन झडपा शस्त्रक्रियेद्वारे थेट बसविण्यास कोणतीही अडचण नाही.
या नव्या प्रकारच्या झडपा तयार करण्यासाठी सेंटर फॉर ऑटोमेशन अँड स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांच्या सहकार्याने डॉ. चेरियन गेल्या वर्षभरापासून संशोधन करत होते. ते म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांपासून हृदय झडपा बदलण्याच्या शस्त्रक्रिया जगभर केल्या जात आहेत. शस्त्रक्रियेच्या वेळी बसविलेल्या नव्या हृदय झडपा पाच ते दहा वर्षांनी खराब होतात, असे दिसून आले आहे. मात्र, आम्ही बनविलेल्या नव्या प्रकारच्या हृदयाच्या झडपेचे आयुष्यमान त्यापेक्षा अधिक आहे.