मुंगेर – बिहारच्या मुंगेर येथे मनाला वेदना देणारी धक्कादायक घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या ५ तासांत नवरीने जीव सोडला त्यानंतर पतीने तिला मुखाग्नी दिला. ८ मे रोजी निशाचं लग्न महाकोला गावातील रवीशसोबत झालं होतं. लग्नात ७ फेरे घेऊन मंगळसूत्र घातल्यानंतर अचानक नवरीची तब्येत बिघडली. तिला भागलपूरच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालावली.
निशाचा मृतदेह गावात पोहचताच कुटुंबाने हंबरडा फोडला. मुंगेर मुख्यालयाच्या ५० किमी अंतरावर असलेल्या खुदिया गावातील लग्नात अवघ्या ५ तासांत नवरी मुलीचा मृत्यू झाल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. गावात ही बातमी पसरताच सगळ्यांना धक्का बसला. ही ह्दयद्रावक घटनेने गावकऱ्यांना वेदना झाल्या. ८ मे रोजी खुदिया गावातील रंजन यादव यांची मुलगी निशा यादवचं लग्न होणार असल्यानं कुटुंबातील सगळेच आनंदात आणि उत्साहात होते.
सध्याची कोविड परिस्थिती पाहता अत्यंत कमी उपस्थितीत महाकोला गावातून सुरेश यादव यांचा मुलगा रवीशचं वऱ्हाड गावात पोहचलं. लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. ७ फेरे आणि मंगळसूत्र घातल्यानंतर नवरी निशाची तब्येत अचानक बिघडल्याने लग्न मंडपात गोंधळ उडाला. निशाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची गंभीर स्थिती पाहता निशाला भागलपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. भागलपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी लग्नाच्या अवघ्या ५ तासानंतर निशाने अखेरचा श्वास घेतला.
निशाच्या अचानक जाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यभर पतीची साथ निभावेन असं सांगत ७ फेरे घेतलेल्या निशाने अवघ्या ५ तासांत जगाचा निरोप घेतला. निशाच्या निधनानंतर गावात भयाण शांतता पसरली. दोन्ही कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. पत्नीला घरी नेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रवीश कुमारवर निशाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची वेळ आली. काही तासांपूर्वी सामाजिक, कौटुंबिक दायित्व स्वीकारणाऱ्या रवीशने निशाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. स्मशानभूमीत पती रवीशला निशाच्या मृतदेहाला मुखाग्नी देताना पाहून सगळेच भावूक झाले.