भोपाळ - मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे बहिणीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या चुलत भावाने तिच्या पेटत्या चितेवर उडी मारून जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्करणी पोलिसांनी तक्रार नोंदवत तपास सुरू केला आहे.
ही घटना मझगवां या गावात घडली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी शेतामध्ये गेलेली ज्योती उर्फ प्रिती दांगी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीमध्ये तिचा मृतदेह मिळाला होता. पंचनामा करून त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता प्रीतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी ज्योतीच्या काकांचा मुलगा करण दांगी धार जिल्ह्यातून सागर जिल्ह्यातील मझगवां येथे दुचाकीवरून पोहोचला. त्यानंतर दुचाकी रस्त्यावर उभी करून तो स्मशानात गेला. तिथे त्याने बहिणीच्या भडकलेल्या चितेला नमस्कार केला. त्यानंतर त्याने चितेत उडी घेतली. गावकऱ्यांनी हा प्रकार पाहताच कुटुंबीयांना माहिती दिली.
दरम्यान, नातेवाईक पोहोचेपर्यंत त्याचं शरीर पूर्णपणे जळालं होतं. घाईगडबडीत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र वाटेतच त्याने प्राण सोडले. रविवारी सकाळी ज्योतीच्या चितेजवळच करणच्या चितेवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
मझगवा गावाचे सरपंच भरत सिंह घोसी यांनी सांगितले की, बहिणीच्या चितेवर उडी मारल्याने भाऊ होरपळला होता. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोकाचं वातावरण आहे.
बहरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी दिव्य प्रकाश त्रिपाठी यांनी सांगितले की, ज्योतीचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे देण्यात आला होता. गावातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ आला आणि त्याने चितेत उडी मारली. दरम्यान, दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.