मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृत्यूदरही वाढला आहे. स्मशानात पार्थीव शरिरांच्या रांगा लागल्या असून हॉस्पीटलही रुग्णांनी भरुन गेली आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, काही घटनांनी मन सुन्न होऊन जातं. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सकारात्मकतेनं मात करणाऱ्याचं धैर्य दाखवणाऱ्या ब्रेव्ह गर्लचा मृत्यूही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
निराश आणि मरगळलेल्या वातावरणात एखादी कृती अनेकांचे मन जिंकून जाते. कित्येक रुग्णांना आशादायी वाटून जाते, अशीच कृती दिल्लीतील रुग्णालयात दाखल झालेल्या 30 वर्षीय तरुणीने केली होती. निराशेवर मात करणाऱ्या या ब्रेव्ह गर्लची कोरोनाविरुद्ध लढाई अपयशी ठरली आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा व्हिडिओ डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामध्ये, तोंडाला ऑक्सिजन लावून बेडवर लव्ह यू जिंदगी... हे गाणं ही तरुणी ऐकत होती, या गाण्याच्या सूरांसोबतच ती लयबद्ध डान्सही करताना व्हिडिओत दिसत आहे.
डॉ. मोनिका लंगेह यांनी आज पुन्हा एकदा या मुलीसंदर्भातील ट्विट करत, माफी मागितली आहे. आपण, या ब्रेव्ह गर्लला वाचवू शकलो नाहीत. तिच्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही डॉ. मोनिका यांनी केली आहे. 13 मे रोजी रात्री 9.30 वाजता या मुलीचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलीच्या व्हिडिओमुळे अनेकांनी तिच्या इच्छाशक्तीचं आणि मनोधैर्याचं कौतुक केलं होतं. मात्र, तिच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडिया हळहळला आहे. अनेकांना दु:ख व्यक्त केलंय.