अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहाच्या हसनपूरात गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या २० वर्षीय मुलीचं लग्नाच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही युवती ५ दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर मुरादाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ मार्चला तिचं लग्न होते. परंतु तापामुळे ती रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु ज्यादिवशी तिचं लग्न होते त्याच दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाला धक्का बसला. लग्नाच्या आनंदावर विरजन पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, रुस्तमपूर खादर इथं शेतकरी चंदकिरन त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. चंदकिरन वाट्याने शेती करत होते. त्यांची मोठी मुलगी कविता हिचं हसनपूर इथं राहणाऱ्या मिंटूशी लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबाने लग्नाची तारीख निश्चित केली. १५ मार्च रोजी कविता आणि मिंटू दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार होते. परंतु त्याआधीच कविताची तब्येत ढासळली.
कविताला गेल्या ५ दिवसांपासून खूप ताप आला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी मुरादाबादच्या हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. लग्नाची तारीख जवळ येत होती तरीही कविता ताप काही गेला नव्हता. कविताची तब्येत सातत्याने खराब होत चालली होती. त्यामुळे आता तिच्या वाचण्याचे काही अपेक्षा नाही असं डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितले होते.
कविताची तब्येत आणखी बिघडत गेली आणि अखेर ज्यादिवशी कविताचे लग्न ठरलं होते त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. कविताच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबात शोककळा पसरली, गावकरीही हळहळले. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना अचानक सर्वांच्या आनंदावर विरजन पडले. कविताचं ज्या मिंटूसोबत लग्न होणार होते त्याच्या घरीही शोककळा पसरली.
नवरीसारखं सजवून तिच्यावर केले अंत्यसंस्कारमृत्यूनंतर कविताचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला. ज्या घरात लग्नाची सनई ऐकायला येणार होती तिथं सन्नाटा पसरला होता. आई वडिलांच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते. त्या परिस्थितीत कविताला नव्या नवरीसारखं सजवण्यात आले. त्यानंतर तिची अंत्ययात्रा निघाली आणि बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.