हत्येच्या प्रयत्नात तुरुंगात बंद असलेल्या पतीला आठ महिन्यांची गर्भवती महिला भेटण्यासाठी गेली होती. २० दिवसांनी तिची डिलिव्हरी होती. परंतू, पतीला पाहताच ती बेशुद्ध झाली, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याची हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे.
महिलेच्या दीराने पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. ही घटना कारा तुरुंगातील आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. भागलपूरच्या घोघा गोविंदपूरच्या गुड्डू यादवचे लग्न दोन वर्षांपूर्वी पल्लवीसोबत झाले होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता. पल्लवी आठ महिन्यांची गर्भवती होती. तिला डिलिव्हरीची २७ जून ही तारीख देण्यात आली होती.
गुड्डू यादव आणि विनोद यादव यांच्याच जमिनीवरून वाद झाला होता. या प्रकरणात गुड्डू कलम 307 च्या गुन्ह्याखाली तुरुंगात गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षा भोगत होता. डिलिव्हरीपूर्वी त्याला भेटण्यासाठी पल्लवी तुरुंगात आली होती. जसा गुड्डू तिच्यासमोर आला तशी ती चक्कर येऊन खाली कोसळली. तिला तातडीने मायागंज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिची तपासणी करून डॉक्टरांनी पल्लवीला मृत घोषित केले. याचबरोबर तिच्या गर्भातील अर्भकाचाही मृत्यू झाला.
गुड्डूचा भाऊ विक्की यादवच्या आरोपांनुसार पोलिसांनी मनमानी केल्याने पल्लवीचा मृत्यू झाला आहे. विनोद यादवकडून पैसे घेऊन पोलिसांनी गुड्डूला तुरुंगात पाठविले. जर गुड्डू तुरुंगात गेला नसता तर ही वेळ आली नसती. आज आमच्या पूर्ण कुटुंबाची वाताहात झाली आहे. या पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे, असे तो म्हणाला.