नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिंपिकपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे कौतुक केले आहे. चमत्कारीक टॅलेंट असलेल्या पी.व्ही. सिंधूने पुन्हा एकदा जगभरात भारताची मान उंचावली आहे. देशवासियांना सिंधूच्या या कामगिरीचा अभिमान असल्याचं मोदींनी ट्विट करुन म्हटल आहे. बीडब्लूएफ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिंधुचे हार्दीक अभिनंदन!, असे मोदींनी म्हटले.
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.
सिंधुच्या या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियातून सिंधूच्या या कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज सिंधूच्या आईचा बर्थ डे आहे, त्यामुळे आजचं पदक मी माझ्या आईला समर्पित करते, असे सिंधू म्हटले. सिंधूच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विट करुन तिचे अभिनंदन केले. आपल्या बॅडमिंटन खेळासाठी घेतलेली मेहनत आणि पॅशन यांमुळे सिंधूने अनेकदा बॅडमिंटन खेळाला मोठं केलं आहे. खेळाडू असणाऱ्या प्रत्येकाला सिंधूचा आजचा विजय, गोल्डमेडल प्रेरणादायी ठरेल, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.