ऑनलाइन लोकमत
गोदावरी (आंध्रप्रदेश), दि. १४ - आंध्रप्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका शिक्षकाने क्षुल्लक कारणावरुन चार वर्षाच्या मुलीला गरम लोखं[डी घसरगुंडीवर बसण्याची अघोरी शिक्षा दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालक व अन्य नातेवाईकांनी शाळेबाहेर आंदोलन करत संबंधीत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पश्चिम गोदावरी येथील एलुरू येथील एका शाळेत शिकणा-या चार वर्षाच्या चिमुरडीने शाळेत वर्गात लघुशंका केली होती. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने त्या चिमुरडला गरम लोखंडी घसरगुंडीवर बसण्याची शिक्षा दिली. यात ती चिमुरडी भाजली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान, या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पिडीत मुलीच्या पालकांनी केली आहे. तर आंध्रप्रदेशमधील महिला व बाल हक्क आयोगाने पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना नोटीस बजावत घटनेसंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.